कोल्हापुर : कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मास्क न वापरणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आली आहे.कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचा भंग आणि मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईसाठी त्यांना पोलीस बंदोबस्तही आहे. तरीही विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही.
याची दखल घेत प्रशासनाने शहरात सेफ सिटी अंतर्गत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मास्क न वापरणाऱ्यांची छायाचित्रे काढून संबंधित व्यक्तीवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कारवाईसाठी पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची मदत घेतली जात आहे.