सांगली : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या व मृत्यू दर पाहता संपूर्ण जिल्हा १४ दिवसासाठी लॉकडाऊन करावा अशी मागणी सोमवारी व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली.
जनता कर्फ्यु प्रभावी ठरत नसल्याने संचारबंदी लागू करून कोरोनाची साखळी तोडावी. त्यासाठी व्यापारी संघटना प्रशासनासोबत असल्याचा निर्वाळा देण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांच्या नेतृत्वखालील व्यापारी शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. तसेच पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनाही निवेदन पाठवून दिले.
याबाबत शहा म्हणाले की, जिल्ह्यात आणि प्रामुख्याने महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्याचा मृत्युदर काळजीत टाकणारा आहे. पूणे, मुंबईसारखी स्थिती झाली आहे. वेळीच नियंत्रण न आणल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. व्यापारी, उद्योजकांनी हे बाजारपेठेत कठोर उपाययोजना करून व्यवसाय सुरू केले आहेत. पण हे उपाय अपुरे पडू लागले आहेत.
व्यापारी समाज करून व्यवसाय करीत आहे कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचा दर नियंत्रणात आणण्याची गरज आहे. कोरोनाची संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १४ दिवसाचा कडक लॉकडाऊन करावा. तसेच संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करावी. जिल्ह्यात बाहेरील व्यक्तीसाठी बंदी घालावी.
केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय लॉकडाऊन लागू करता येत नाही. त्यासंदर्भात जिल्ह्यातील स्थिती केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी. केंद्र सरकारही संवेदनशील स्थिती पाहून परवानगी नाकारणार नाही. जनता कर्फ्यु प्रभावी ठरणार नाही. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावर जिल्हाधिकार्यांनी पालकमंत्र्यांशी सल्लामसलत करुन लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याचे शहा म्हणाले. यावेळीअसोसिएशनचे सुरेश पटेल, सोमेश बाफना, धीरेन शहा उपस्थित होते. चौकट तज्ञांची समिती स्थापन करा : समीर शहा जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी विविध उपाययोजना केल्या असल्या तरी त्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत. यासाठी विविध व्यापारी संघटनांशी चर्चा करून प्रशासनाकडे लॉकडाऊनची मागणी केली आहे. लॉकडाऊननंतर बाजारपेठेतील उपाययोजनांचा आराखडाही दिला आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील तज्ञ, व्यापारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांची एक समिती स्थापन करावी, अशी मागणी केल्याचे समीर शहा यांनी सांगितले.