कोल्हापूर : ब्रेक द चेन अंतर्गत सरसकट बंदला विरोध करत मंगळवारी कोल्हापुरातील व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवली. चेंबर ऑफ कॉमर्सच्या आवाहनानंतर दुपारी तीननंतर मात्र सगळ्यांनी कडकडीत बंद पाळला. आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबतच्या चर्चेत अंतिम निर्णय होणार असून सगळ्यांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रविवारी शासनाने ब्रेक द चेन अंर्तगत नवी नियमावली जाहीर केली आहे. यात सरसकट सर्व दुकाने बंदचा आदेश आल्याने कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने सोमवारी त्याला जोरदार विरोध करत पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हा प्रशासनाला आम्ही दुकाने सुरूच ठेवणार असा इशारा दिला होता.
त्यानुसार मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यात आली. त्यानंतर महापालिकेचे कर्मचारी व पोलीसांच्यावतीने दुकाने बंद करा असे आवाहन करण्यात येत होते मात्र दुकानदारांनी त्याला विरोध करत दुकाने सुरूच ठेवली. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्याने ग्राहकांची संख्या कमी होती. महाद्वार रोडवरील काही दुकाने व फेरीवाल्यांकडे मोजके ग्राहक येत होते.महाद्वार, पापाची तिकटी पुर्णक्षमतेने सुरूसकाळपासूनच महाद्वार आणि पापाची तिकटी ही मध्यवर्ती बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू होती. येथे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले मात्र व्यावसायिकांनी त्यास नकार देत व्यवसाय सुरूच ठेवला. प्रशासनानेही बंदची सक्ती केली नाही. दुपारी तीननंतर मात्र दुकाने बंद ठेवली गेली. राजारामपूरी व शाहुपूरीत सकाळी दुकाने सुरू होती. पोलिसांनी आवाहन केल्यानंतर काहीजणांनी दुकाने बंद ठेवली तर काही दुकाने अर्धे शटर ओढून सुरू होती.