कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून कोल्हापूरकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी शुक्रवार (दि. ११) ते बुधवार (दि. १६) पर्यंत सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी मंगळवारी घेतला. त्यासह लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापार दहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, शहर आणि जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील उद्योग सुरू राहणार आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दक्षता म्हणून विविध तालुके आणि गावांनी जनता कर्फ्यू पुकारला आहे. त्यापार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने व्यापारी, व्यावसायिकांची कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनमध्ये बैठक घेण्यात आली.
त्यात विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, सभासदांनी संमिश्र मते मांडली. अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून सहा दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची घोषणा ह्यकोल्हापूर चेंबरह्णचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केली.जनता कर्फ्यू करण्याबाबत काही असोसिएशनची कोल्हापूर चेंबरकडे मागणी होती. त्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये लॉकडाऊन करायचे असेल, तर कडक करा. औषध दुकाने, कृषी दुकाने आणि दुध हे वगळता अन्य सर्व काही बंद ठेवावे, अशी विनंती आम्ही जिल्हा प्रशासनाला करणार आहे. किराणा भुसार असोसिएशन, ग्रेन मर्चंटस असोसिएशन, मसाला व्यापारी, आदींच्या असोसिएशनने या लॉकडाऊनमध्ये सहभागी होण्याचे ठरविले आहे.
आठ तालुक्यांबरोबर कोल्हापूर शहरामध्येही लॉकडाऊन अथवा जनता कर्फ्यू करून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करण्याचा आमचा विचार आहे. दि. ११ ते १६ सप्टेंबर दरम्यान लॉकडाऊन केले जाणार आहे. लोकांनी दोन दिवसांत आवश्यक ते खरेदी करून घ्यावे. दि. १५ सप्टेंबरपर्यंत ॲडव्हान्स टॅक्स भरायचा असल्याने बँका सुरू ठेवण्याची आम्ही मागणी करणार आहे. कोल्हापूर चेंबरशी विविध ४२ संघटना संलग्नित आहेत. या लॉकडाऊनमध्ये उद्योग सुरू राहणार आहेत.प्रत्येक सभासदांना मत मांडण्याची संधी मिळावी म्हणून ही बैठक घेण्यात आली. सर्व काही बंद राहिल्यास व्यापार, व्यवसायही आपोआप बंद ठेवावे लागणार आहेत.