तानाजी पोवारकोल्हापूर : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संसर्ग थांबविण्यासाठी कैद्यांचे हातही सरसावले आहेत. कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिलाई विभागातील सुमारे ५० कैदी गेले आठवडाभर अहोरात्र राबत आहेत. आतापर्यंत सुमारे १० हजार मास्क व रुमाल तयार केले आहेत.
कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मागणीप्रमाणे कारागृहातील बंदीजन, अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा, सामाजिक संस्थांनाही हे मास्क पुरविण्यात आले आहेत. रत्नागिरी आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने मास्कची मागणी केली आहे. तर इतर जिल्ह्यांतूनही मागणी वाढत असल्याने मास्क तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.‘कोरोना’च्या धास्तीमुळे कारागृह प्रशासनही सावध झाले आहे. कळंबा कारागृहात विविध माध्यमांतून शिक्षा भोगणारे सध्या २३६० कैदी आहेत. त्यापैकी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, आदी भागातील सुमारे १३०० कच्चे कैदी आहेत. ‘कोरोना’च्या धर्तीवर कारागृहातील सुरक्षाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी प्रथम कैद्यांनी २००० मास्क तयार केले.
हे मास्क कळंबा मध्यवर्ती कारागृहासह बिंदू चौक उपकारागृहातील बंदीजन, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वितरित करण्यात आले. आता ‘कोरोना’चा संसर्ग वाढल्याने आणखी मास्कची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे कारागृहातील शिलाई विभागातील ५० कैद्यांचे हात अहोरात्र मास्क व रुमाल करण्यासाठी राबत आहेत.
आतापर्यंत गेल्या आठ दिवसांत सुमारे १० हजार मास्कची निर्मिती करून त्याचे नाममात्र दरात वितरणही कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तसेच खासगी सामाजिक संस्थांना करण्यात आले आहे.
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारागृहातील कैद्यांनीही मास्क व रुमाल बनवून पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कारागृहात कैद्यांची स्वतंत्र यंत्रणा अहोरात्र शिलाईचे काम करीत आहे. आता राज्यभरातून मास्क व रुमालांसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. मागणीप्रमाणे मास्क तयार करून त्याचे वितरणही सुरू केले आहे.- शरद शेळके,अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह.