कोल्हापूर : पालकांची संमतीपत्रे मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील २६० माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये भरण्याची घंटा सोमवारी वाजली. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरले. या शाळांमध्ये एकूण १५११२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या शाळा सुरू होण्याची संख्या टप्प्या-टप्याने वाढणार आहे.पालकांची संमतीपत्रे, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणीच्या पार्श्वभूमीवर दि. ७ डिसेंबरपासून टप्प्या-टप्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय संस्थाचालकांनी घेतला आहे. त्यानुसार शाळा सुरू करण्याची कार्यवाही सोमवारपासून सुरू झाली. निर्जंतुकीकरण केलेल्या या शाळांनी सकाळी आठ ते दुपारी एक यावेळेत वर्ग भरविले.
शाळांच्या प्रवेशव्दारे सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग केले होते. थर्मल गनव्दारे तपासणी करून विद्यार्थी, विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश देण्यात आला. सॅनिटायझरसह हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली. शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. या शाळांमधील एकूण विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत सुमारे ३० टक्के विद्यार्थी उपस्थित राहिले.
एका बाकावर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था केली होती. त्यांना वेळापत्रक, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती दक्षता घेऊन शाळा भरणार आहे. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. संमतीपत्रे मिळालेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांचे एका दिवशी, तर उर्वरीत विद्यार्थ्यांचे दुसऱ्या दिवशी वर्ग भरविण्याचे नियोजन शाळांनी केले आहे.सुरुवातीला भीती, नंतर आनंदकोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले वर्ग सोमवारी भरले. शाळेत येताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला थोडी भीती होती. पण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्र-मैत्रिणीसमवेत संवाद साधल्यानंतर या विद्यार्थ्यांची भीती दूर झाली. शाळा सुरू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पसरला होता.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- एकूण शाळा : १०५४
- इयत्ता नववी, दहावीचे विद्यार्थी : ११९६२७
- इयत्ता अकरावी, बारावीचे विद्यार्थी : १०४८१६
- शिक्षक : ९६७९
- शिक्षकेत्तर कर्मचारी :५४७३
सर्व शाळांच्या निर्जंतुकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पालकांची संमतीपत्रे मिळालेल्या, शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी झालेल्या अशा २६० शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होण्याची संख्या टप्प्या-टप्याने वाढेल. संमतीपत्रे मिळाल्याशिवाय मुख्याध्यापकांनी वर्ग भरवू नयेत.-किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी