वडणगे-कोल्हापूर : सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार करण्याच्या वडणगे पॅटर्नला प्रत्यक्षात सुरुवात झाली. वडणगे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या रुग्णाला किट देऊन, मनोबल वाढवून त्याच्याच घरी स्वतंत्रपणे गृह विलगीकरणात ठेवण्यात आले.
वडणगे ग्रामपंचायतीने पुढाकार घेत अशा पद्धतीने उपचारासाठी मागणी केली होती. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी परिपत्रक पाठवून मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.गावातील एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्यावर शिंगणापूर येथील कोविड काळजी केंद्रात पाठविले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून या रुग्णाला लक्षणे नसल्याने त्यास गृह विलगीकरणात ठेवता येईल, असे सांगितले. या रुग्णाच्या घरी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे, असे पत्र ग्रामपंचायतीने कोविड काळजी केंद्राला दिल्यानंतर रुग्णाला घरी राहण्याची परवानगी देण्यात आली.रुग्णाचे मनोबल वाढविण्यासाठी ग्रामपंचायत, दक्षता समिती सदस्य यांनी रुग्णाच्या कॉलनीत जाऊन रुग्णाशी आणि नातेवाइकांशी घराबाहेरून संवाद साधला. घराच्या वरील मजल्यावर स्वतंत्र खोलीमध्ये रुग्ण राहणार आहे.
कुटुंबातील दोन सदस्य खालील खोलीमध्ये राहणार आहेत. रुग्णाने कोणती काळजी घ्यावी, सदस्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत शासनाने दिलेली नियमावली त्यांना देण्यात आली.डॉ. संदीप पाटील, स्थानिक खासगी डॉक्टर अभिजित गाडीवड्ड हे या रुग्णाशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून नोंदी घेणार आहेत. सोशल कनेक्टतर्फे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी काढा करण्याचे साहित्य, ड्रायफ्रुट, नाचणी सत्त्व रुग्णाला दिले.
सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सतीश पाटील, बाजीराव पाटील, रवींद्र पाटील, राजू पोवार, महालिंग लांडगे, अमर टिटवे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश बागूल यांच्यासह कोरोना दक्षता समिती, ग्रामपंचायतीचे सदस्य, वैद्यकीय, प्रशासकीय व ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.