कोल्हापूर : कोरोना रुग्णांची जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. आजही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी सीपीआरमध्ये गर्दी होत आहे. कोरोनाच्या धास्तीने सीपीआर आवारात शुकशुकाट जाणवत असला तरीही अपघात विभागाच्या परिसरात नातेवाइकांना बेड मिळण्यासाठी वेटिंगला असणाऱ्यांची गर्दी मोठी दिसते.गेले पाच-सहा महिने कोरोना महामारीने जिल्ह्याला विळखा घातल्याचे दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांत रुग्ण व मृत्यू संख्येने कहर केला आहे. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी नातेवाइकांची धावाधाव सुरूच आहे. खासगी रुग्णालयात पैसे असल्याशिवाय जाता येत नसल्याची सर्वसामान्यांची स्थिती झाली आहे.
सीपीआर रुग्णालयात सुमारे ४५० बेड असले तरीही ते फुल्ल आहेत. त्यामुळे रुग्णांचे वेटिंग अद्याप थांबलेले नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रविवारी सीपीआर आवारात भीतीने शुकशुकाट होता, तर अत्यावश्यक रुग़्णांसाठी वेटिंगचे नऊ बेड अपघात विभागात ठेवण्यात आले आहेत.
तेथेही रुग्णसंख्येने रुग्ण बेड फुल्ल असल्याने तेथून एखादा रुग्ण बरा होऊन घरी जाईल व आपल्या नातेवाइकांना बेड मिळेल या अपेक्षेने केविलवाणी परिस्थिती करून नातेवाइकांची गर्दी अपघात विभागासमोर दिसते आहे.
सध्या सीपीआरमध्ये ३२४ कोरोनाचे अत्यवस्थ रुग्ण उपचार घेत आहेत, तर उर्वरित बेडही रुग्णांनी फुल्ल आहेत. याशिवाय जिल्ह्यात तब्बल ८८ कोविड सेंटरवर १०७०० कोरोना रुग़्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर दिवसागणिक ८०० ते १००० पर्यत नव्या रुग़्णांची भर पडत असल्याने त्यांना बेड मिळवून देताना प्रशासनाची कसरत होत आहे.