कोल्हापूर : मास्क घालत नसणाऱ्यांनी आता सावध राहावे; कारण आज, बुधवारपासून केएमटीचे पथक प्रत्येक प्रभागात फिरणार असून मास्क नसणाऱ्यांची थेट ५०० रुपयांची पावती फाडणार आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी स्वतंत्र २०० जणांची नियुक्ती केली आहे.अन्लॉकमुळे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घरातून बाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. विनामास्क कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई सुरू आहे. आज, बुधवारपासून कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे.
महापालिकेकडून केएमटीच्या २०० चालक, वाहकांना दंडवसुलीचे अधिकार दिले असून त्यांचे पथक तयार केले आहे. मंगळवारी पथकाला प्रशिक्षण देण्यात आले. एक चालक, एक वाहक अशी ८१ प्रभागांसाठी १६२ जणांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे पावती पुस्तकासह कारवाईचे अधिकारपत्रही दिले आहे.
शहरातील ८१ प्रभागांसह गर्दी होणारी १० ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणी कारवाईसाठी विशेष ३८ जणांचे पथक आहे. चार कर्मचारी गर्दीच्या ठिकाणी दिवसभर तळ ठोकून असणार आहेत. मास्क नसणाऱ्यांवर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसणाऱ्यांकडून ते दंड वसूल करणार आहेत.- चेतन कोंडे, साहाय्यक आयुक्त, महापालिका