राम मगदूम
गडहिंग्लज : कोरोनाच्या महामारीपासून गावाच्या संरक्षणाची काळजी वाहताना गडहिंग्लज तालुक्यातील ५ ग्रामसेवक व त्यांची १३ कुटुंबीय बाधित झाले आहेत. त्यामुळे गावासाठी झटणाऱ्या ग्रामसेवकाला वाली कोण? असा सवाल विचारला जात आहे.गडहिंग्लज तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या बाराशेच्या घरात पोहोचली असून दुर्देवाने आजपर्यंत ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण चांगले असले तरी संसर्ग आणि मृत्यूदर वाढत आहे. त्यामुळे कोरोनाविरोधी लढाईतील सर्व घटकांसह जनतेतही भिती आहे.गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामसेवक अहोरात्र झटत आहेत. एखाद्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याला उपचारासाठी हलविण्याबरोबरच त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून समूह संसर्ग टाळण्यासाठी ते डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. म्हणूनच ग्रामीण भागातील कोरोनाची साथ नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे.परंतु, कितीही काळजी घेतली तरी अनावधानाने बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे ग्रामसेवकदेखील बाधित होत आहेत, त्याचा फटका त्यांच्या कुटुंबियांनाही बसत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांसह त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.स्वतंत्र सेंटरची गरजबाधित ग्रामसेवकांना लवकर बरे होवून पुन्हा सेवेत रूजू होण्याकरिता त्यांच्यासाठी प्रसन्न वातावरणातील ह्यस्वतंत्र केअर सेंटरह्णची गरज आहे. तिथे वैद्यकिय उपचार, सकस आहार, समुपदेशन, मनोरंजन इत्यादीची व्यवस्था असावी. त्याठिकाणी त्यांच्या बाधित कुटुंबियांनाही उपचार घेता येतील. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील गडहिंग्लजहमध्ये हे केंद्र उभे राहिल्यास राज्यातील अन्य तालुक्यांसमोरही एक आदर्श ठेवला जाईल.बीडीओंनी पुढाकार घ्यावाबीडीओ शरद मगर हे अत्यंत संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि उपक्रमशील अधिकारी आहेत. त्यांनी पुढाकार घेतल्यास ग्रामसेवक संघटनेसह लोकसहभागातून असे सेंटर उभे राहू शकते. त्यामुळे ग्रामसेवकांसह अन्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढण्यास मदत होईल.
मानसिक तणावाखाली..!एका ग्रामसेवकाच्या कुटुंबातील १० जण, एकाच्या कुटुंबातील दोघेजण आणि पत्नीसह एकजण आजपर्यंत बाधित झाले आहेत. खाजगी दवाखान्यातील उपचाराचा खर्च परवडेनासा झाला असून सरकारी कोविड रूग्णालयात बेड उपलब्ध होईनात. म्हणूनच ते मानसिक तणावाखाली आहेत.