गडहिंग्लज : कोरोना महामारीत मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गडहिंग्लज विभागातून लाकूड व शेणीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध संस्था, सामाजिक संघटनांसह गावोगावचे ग्रामस्थ स्वत:हून ही मदत आणून गडहिंग्लज नगरपालिकेकडे सुपूर्द करीत आहेत. बुधवारी (१६) अकरा गावांनी ही मदत दिली.एप्रिलपासून आजअखेर गडहिंग्लज नगरपालिकेने सुमारे ५० कोविड रूग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. गडहिंग्लज, आजरा व चंदगडसह सीमाभागातील कोविड मृतांवर गडहिंग्लज शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे शेणी आणि लाकडाची कमतरता निर्माण झाली होती. त्यामुळे नगरपालिकेतर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले होते.बुधवारी (१६) चंदगड लाकूड ठेकेदार संघटनेसह तालुक्यातील कालकुंद्री व सडेगुडवळे तर गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे, निलजी, चन्नेकुप्पी, बसर्गे, शेंद्री, उंबरवाडी व नांगनूर येथील ग्रामस्थांनी गावात फेरी काढून शेणी आणि लाकडे जमवली आणि स्व:खर्चाने गडहिंग्लजला आणून पालिकेकडे पोहोच केले.मुस्लिम बांधवांकडून सुरूवातकोविड रूग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी नगरसेवक महेश कोरी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आवाहन करताच गडहिंग्लज शहरातील लकी खिदमत फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ४ हजार शेणी गोळा करून दिल्या. त्यानंतर उंबरवाडी येथील मुस्लिम तरूणांनीही शेणी व लाकडे आणून दिली.प्रांताधिकाऱ्यांचे आवाहनप्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी प्रशासनातर्फे गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात महसूल यंत्रणेसह ग्रामपंचायती आणि विविध संघटनांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार चंदगड लाकूड ठेकेदार संघटनेने १ ट्रक लाकूड दिले.