सडोली (खालसा) : करवीर तालुक्यातील पश्चिम भागाला कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असताना, मात्र आरोग्य विभागाने कुरुकली (ता. करवीर) कोविड सेंटर पूर्ववत न केल्याने रुग्णांना खासगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत असून लोकांचा जीव गेल्यानंतर हे कोविड सेंटर सुरू करणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.
करवीर तालुक्यातील भोगावती खोऱ्यातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून, मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा आकडा भविष्यात मोठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गतसाली आरोग्य विभागाने भोगावती परिसरात कोरोनाचा धोका लक्षात घेऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कुरुकली( ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयाची इमारत ताब्यात घेऊन सुसज्ज असे कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने हे कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. रुग्णवाढीचा वेग पाहता भविष्यात परिस्थिती भयावह होण्याची शक्यता असल्याने पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एक महिन्यापूर्वी कुरुकली येथील कोविड सेंटर पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात राजकीय शक्तीचा अभाव असल्याने प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात कोरोना केअर सेंटरची उपलब्धता होण्याच्यादृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. हे कोविड सेंटर पूर्ववत झाल्यास कोल्हापूर शहरातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार असून भोगावती खोऱ्यासह करवीरच्या पश्चिम भागातील गरीब आणि सामान्य रुग्णांना आर्थिक झळ बसणार नाही. शासनाने पुन्हा हे सेंटर पूर्ववत करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.