बोरवडे : सर्वत्र हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा प्रभाव पुन्हा नव्याने वाढू लागल्याने कपडे धुणे व इस्त्री करून देणाऱ्या परीट व्यावसायिकांची दुकानेही बंद करण्यात आल्याने मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी त्यांची आर्थिक घडी बिघडली आहे. यामुळे हातावर पोट असलेले हे दुकानदार व त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
शहरी भागासह ग्रामीण भागातही कपडे धुणारे व कपड्यांना इस्त्री करून देणारे लाँड्रीधारक आहेत. लहानशा गावात एक - दोन, तर मोठ्या गावात चार ते पाच, कपडे इस्त्री करून देणारी दुकाने आहेत. कपडे धुणे, इस्त्री करणे, भट्टी करणे, स्टार्च करणे या कामांतून दिवसा ३०० ते ४०० रुपये परीट दुकानदारांना मिळतात.
चौकट
"कपड्यांना इस्त्री करून मिळणाऱ्या पैशावरच आमची रोजी - रोटी अवलंबून आहे. संचारबंदीमुळे दुकाने बंद ठेवावी लागणार असल्याने आमची कुटुंबे अडचणीत आली आहेत. एक वर्ष आम्ही कर्ज काढून घरे चालवली. अनेकांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आता कुटुंब जगवायचे कसे, याची चिंता सर्वांना लागली आहे. इतर व्यावसायिक धारकांप्रमाणे सरकारने आम्हालाही अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे"
- सदाशिव परीट (इस्त्री व्यावसायिक, बोरवडे)