लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात प्रत्येक कामगारांच्या घामाचा, श्रमाचा पैसे असून त्याचा विनियोग त्यांच्या कल्याणासाठीच केला जाईल. बांधकाम कामगाराचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याला अपघात योजनेतून लाभ देणे, नोंदीत गरोदर महिला कामगाराला चार-पाच महिने अनुदान देण्यासह इतर मागण्यांचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी घोषणा कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा कामगार सुविधा केंद्राचे उद्घाटन व बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ शुक्रवारी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरात झाला. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, मागील आघाडी सरकारमध्ये कामगारमंत्री असताना खऱ्या अर्थाने कल्याणकारी मंडळाला बळकटी मिळाली असून, कल्याणकारी योजना सुरू झाल्या. राेजगार हमीसह २१ कामांचा समावेश मंडळांतर्गत केला असून आरोग्य योजना, अपघात योजना, शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती योजना, आर्थिक योजना, सुरक्षा किट असे अनेक लाभ दिले जातात. कोल्हापूरसह १७ जिल्ह्यांत मध्यान्ह भोजन योजना राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रेडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर म्हणाले, बांधकाम व्यवसायातील महत्त्वाचा घटक हा कामगार असून, मध्यान्ह भाेजन योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. कोरोनामुळे बांधकाम तीन-चार वर्षे रखडणार, मात्र त्याचा सेस पहिल्याच वर्षी घेतला जातो, त्याचे समान चार हप्ते करावेत. आमदार चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चु. श्रीरंगम यांनी प्रास्ताविकात आढावा घेतला. अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी आभार मानले. सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, ‘क्रेडाई’चे सचिव प्रदीप भारमल, प्रकाश देवलापूरकर, श्रीधर कुलकर्णी, संदीप मिरजकर, अजयसिंह देसाई, शिवाजी मगदूम आदी उपस्थित होते.
अन्नाची नासाडी होणार नाही, याची दक्षता घ्या
अत्याधुनिक किचनसह उत्कृष्ट जेवण दिले जाणार आहे. जेवणाबाबत काही तक्रार असेल तर तत्काळ मंडळाला कळवा. मात्र, अन्नाची नासाडी होऊ नये, याची दक्षता घ्या, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
घरासाठी पाच लाख द्या
बांधकाम कामगार संघटनेचे नेते भरमा कांबळे यांनी महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. ६० वर्षांवरील कामगारांना महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन, कोरोनाने मृत्यू झाल्यास पाच लाख रुपयांची मदत, त्याचा उपचाराचा खर्चही मंडळाकडून मिळावा. कामगारांच्या घरासाठींच्या जाचक अटी रद्द करून घरासाठी पाच लाख रुपये द्यावे.
फोटो ओळी :
१) बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ शुक्रवारी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरात झाला. या वेळी अजयसिंह देसाई, आमदार चंद्रकांत जाधव, श्री. चु. श्रीरंगम, शैलेंद्र पोळ आदी उपस्थित होते. (फोटो-०२०७२०२१-कोल-कामगार मंडळ)
२) बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ शुक्रवारी कोल्हापुरात झाला. या वेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. या वेळी श्री. चु. श्रीरंगम, आमदार चंद्रकांत जाधव, शैलेंद्र पोळ उपस्थित होते. (फाेटो-०२०७२०२१-काेल-कामगार मंडळ०१) (छाया- नसीर अत्तार)