आजरा : आजरा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. पण आजरा कोविड सेंटरमध्ये वेळेत उपचार केले जात असल्याने कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१५ टक्के आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले.
आजऱ्यातील डॉक्टर, औषधे दुकानदार यांच्यासमोर ते बोलत होते. तालुक्यातील कोरोनावर नियंत्रण ठेवणे व कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचाराच्या प्रवाहात आणण्यासाठी खासगी डॉक्टर व औषध दुकानातून सर्दी, ताप, खोकला व कोरोनासदृश लक्षणांसाठी उपचार केलेले व औषध दिलेल्या व्यक्तींची पाठीमागील ७ दिवसापासून दैनंदिन माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन यावेळी प्रांताधिकारी डॉ. खिलारी यांनी केले.
तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यासाठी गावोगावी सर्व्हे सुरू केला आहे. वेळेत निदान, वेळेत उपचार व मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा त्या पाठीमागचा हेतू आहे.
त्याचबरोबर गेल्या सात दिवसांपासून तालुक्यातील खासगी दवाखान्यामध्ये कोरोनासदृश लक्षणे असताना उपचारासाठी आलेल्या रुग्णांची यादी तसेच औषध दुकानातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सर्दी-तापाची औषधे घेऊन गेलेल्या व्यक्तींचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे द्यावेत जेणेकरून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.
खासगी डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा बंद न करता कोरोनाबाधित रुग्णांना उपचाराच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असेही आवाहन डॉ. खिलारी यांनी केले.
आजरा ग्रामीण रुग्णालय, उत्तूर, भादवण, मलिग्रे, वाटंगी व आजरा कोविड सेंटर येथे रॅपिड अँन्टीजेन टेस्ट केली जात आहे. याशिवाय आजरा शहरातील सतीश पवार यांच्या खासगी लॅबलाही टेस्ट करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या ठिकाणी ती ४०० रुपये घेऊन तपासणी केली जाईल. शासकीय दवाखान्यात मोफत केली जाणार आहे, असेही डॉ. खिलारी यांनी सांगितले.