गतवर्षी कोरोना प्रादुर्भावाला प्रारंभ झाल्यापासून अनेक कोरोना योद्धे या अत्यंत कठीण काळात प्रसिद्धीपासून दूर राहून समाजसेवा करत आहेत. काकती येथील बेळगाव ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यंकटेश पाटील हे त्यापैकी एक होत.
कोरोना प्रादुर्भाव काळात बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक असणारे काहीजण श्वसनाच्या समस्येमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या आणि संबंधित उपचाराचा खर्च परवडू न शकणाऱ्या कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून आले आहेत. अलीकडे ऑक्सिजन सिलिंडरच्या दुष्काळामुळे अनेक कोरोनाग्रस्तांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. काही एनजीओ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून गरजूंसाठी ऑक्सिजन सिलिंडर्स पुरविले जात आहेत, तथापि ऑक्सिजन सिलिंडरचा वापर झाल्यानंतर त्याचे पुन्हा रिफिलिंग करणे हे संबंधितांसाठी मोठे आव्हानात्मक बनले होते. मात्र, यासाठी काकती येथील बेळगाव ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यंकटेश पाटील यांनी देशाप्रती आपले कर्तव्य समजून मदतीचा हात पुढे केला आहे.
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात ऑक्सिजन पुरवठावरील ताण प्रचंड वाढला आहे. या परिस्थितीत बेळगावात अशी एक व्यक्ती आहे जिने कोरोनाग्रस्तांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर मिळावेत यासाठी एनजीओंना आतापर्यंत ५००० ऑक्सिजन सिलेंडर्स मोफत भरून अर्थात रिफील करून दिले आहेत. काकती येथील बेळगाव ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यंकटेश पाटील ही ती व्यक्ती आहे. जी सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत देशसेवा समजून एनजीओंना त्यांचे ऑक्सिजन सिलिंडर मोफत रिफील करून देत आहे. त्यांच्या कंपनीतील कर्मचारीदेखील कोरोनाग्रस्तांचे जीव वाचविण्यासाठी २४ तास कार्यरत राहून ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेत आहेत. शहरातील बरेच एनजीओ गरीब गरजू कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर्स विनाशुल्क उपलब्ध करून देत असल्यामुळे वापरलेले ऑक्सिजन सिलिंडर्स मोफत रिफील करून देणे हे देशासाठीचे आपले कर्तव्यच असल्याची व्यंकटेश पाटील यांची भावना आहे.
फोटो; बेळगावात ५००० ऑक्सिजन सिलिंडर्स मोफत रिफिल करून देणारा कोरोना योद्धा व्यंकटेश पाटीलसोबत त्यांचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर