प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावून निकालपत्रक, प्रगतिपत्रक हे सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहेत. शिवाजी विद्यापीठाने ऑनलाईन निकाल जाहीर केले आहेत. दरवर्षी इयत्ता पहिली ते दहावीचे शैक्षणिक वर्ष दि. १४ जूनपासून, तर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या द्वितीय, तृतीय वर्ष जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये,तर प्रथम वर्षाचे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. यावर्षी देखील शाळांचे शैक्षणिक वर्ष दि. १४ जूनपासून सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने यापूर्वी जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होईल. मात्र, कोरोनामुळे शाळांमध्ये प्रत्यक्षात वर्ग भरणार नाहीत. कोरोनाची तिसरी लाट जुलैमध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यावर विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून त्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू करण्याची तयारी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाकडून सुरू आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत राज्य शासनाच्या निर्देशांची प्रतिक्षा शाळांना लागली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मात्र, अद्याप ही परीक्षा झालेली नाही. त्यामुळे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष, पहिले सत्र सुरू करण्याबाबत विद्यापीठाकडून अधिविभागप्रमुख, प्राचार्यांसमवेत ऑनलाईन चर्चा सुरू आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाचा संसर्गाची पुढील शक्यता लक्षात घेऊन इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे. शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षाही ऑनलाईन घेण्याची तयारी सुरू आहे. त्याबाबत शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे.
-किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी.
कोरोनामुळे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. ते यापुढेही सुरू ठेवावे लागणार आहे. नव्या शैक्षणिक वर्ष, पहिल्या सत्राची सुरुवात करण्याबाबत प्राध्यापक, विभागप्रमुख, प्राचार्य, आदी घटकांशी सध्या ऑनलाईन चर्चा करण्यात येत आहे. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
-डॉ. पी. एस. पाटील, प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ.