कोल्हापूर : संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत पावले उचलूनही अखेर बिंदू चौक उपकारागृहात कोरोना विषाणूने ‘एन्ट्री’ केलीच. या कारागृहातील ३१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाला. यामुळे कारागृह प्रशासनाची झोप उडाली. बाधित सर्व कैद्यांना प्रशासनाने तातडीने येथील केअर सेंटरमध्ये अलगीकरणात उपचार सुरू केले.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बिंदू चौक उपकारागृहात सुमारे २०० हून अधिक कच्चे कैदी आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन गतवर्षीच नव्याने दाखल होणारे कच्चे कैदी, न्यायालयीन कैदी ‘आयटीआय’ येथे उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहात दाखल करण्यात येत होते. येथे अलगीकरण कालावधीनंतर तपासणीअंती त्यांना बिंदू चौक उपकारागृहात ठेवले जाते. पण गेल्या तीन महिन्यात कोरोनाचा कहर ओसरल्यानंतर ही प्रक्रिया बंद झाली. आता गेल्या महिन्याभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ‘वीकेंड लॉकडाऊन’चा आधार घेतला आहे. दरम्यान, उपकारागृहातील एका कैद्याला शहापूर (इचलकरंजी) येथे तपासकामासाठी नेले होते. त्यावेळी त्याची प्रकृती बिघडली, तपासणीअंती त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर कारागृह प्रशासन हबकले. दक्षतेचा भाग म्हणून प्रशासनाने बिंदू चौक उपकारागृहात त्याच्या संपर्कात आलेल्या ८२ कैद्यांची गुरुवारी (दि. ८) महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात स्त्राव चाचणी घेतली. त्याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाला. त्यात ३१ कैद्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. संबंधितांना तातडीने अलगीकरण केले, त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले.
उपकारागृहात कैदी
पुरुष कैदी - १९९
महिला कैदी - १०
कर्मचारी संख्या- ३१
कोट
बिंदू चौक उपकारागृहातील कच्च्या कैद्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर सर्व ते औषधोपचार सुरू आहेत. त्यांचे अलगीकरण केले आहे. इतरही कैद्यांची तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
- विवेक झेंडे, अधीक्षक, बिंदू चौक उपकारागृह, कोल्हापूर