लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गोकुळ दूध संघासाठी रविवारी (दि. २) मतदान होत असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका केंद्रावर फक्त ५० मतेच घेतली जाणार आहेत. काही ठरावधारक कोरोनाबाधित असल्याचे समजते, त्यांचे मतदान मात्र शेवटच्या तासात घेतले जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक शरद पाटील व डॉ. गजेंद्र देशमुख यांनी ‘गोकुळ’चे मतदान ३५ ऐवजी ७० केंद्रांवर घेण्याचे नियोजन केले आहे. एका केंद्रावर साधारणत: ५० मते नोंदवली जाणार असून सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान हाेणार आहे. त्यामुळे तासाला आठ मते या हिशेबाने मतदान होणार असल्याने गर्दी होणार नाही, याची दक्षता निवडणूक यंत्रणेने घेतली आहे. प्रत्येक सभासदाचे थर्मल स्कॅनिंग करूनच मतदानासाठी आत सोडले जाणार आहे. ताप असणाऱ्या सभासदांना मतदान वेळेच्या शेवटच्या तासात मतदान करण्याची संधी दिली जाणार आहे.
मतदान केंद्रांची संख्या वाढली असली तरी कर्मचारी संख्येत फारसा फरक पडणार नाही. एका केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व सहा अधिकारी असे होते, त्याऐवजी आता एक केंद्राध्यक्ष आणि तीन अधिकारी राहणार आहेत. मतदारांसाठी एक मीटर अंतरावर गोल रिंगण असणार आहे, त्यातूनच पुढे यावे लागणार आहे.
पन्हाळ्यातील एक केंद्र दुसऱ्या शाळेत
तालुक्याच्या ठिकाणीच मतदान होणार असून प्रत्येक तालुक्यात वाढीव मतदान केंद्रे त्याच इमारतीत होणार आहेत. पन्हाळ्यात मात्र तीन केंद्रे दुसऱ्या शाळेत अथवा इतर ठिकाणी करावी लागणार आहेत.
मतदान साहित्य शनिवारीच केंद्रावर
मतदान साहित्य शनिवारी सकाळी तहसीलदारांच्या ताब्यात दिले जाणार असून त्यांच्या पातळीवर त्याचे वाटप होणार आहे.
अठरा टेबलवर मतमोजणी
रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मंगळवारी (दि. ४) सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होणार आहे. अठरा टेबलवर नियोजन केले असून एका टेबलवर तीन कर्मचारी राहणार आहेत. एका टेबलवर दोन्ही पॅनलचे प्रत्येकी दोन असे चार प्रतिनिधींनाच उपस्थित राहता येणार आहे.
या रंगाच्या राहणार मतपत्रिका
सर्वसाधारण गट- पांढरा
महिला - फिकट गुलाबी
अनुसूचित जाती, जमाती -फिकट निळा
भटक्या जाती विमुक्त जमाती - फिकट पिवळा
इतर मागासवर्गीय - फिकट हिरवा
कोट-
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदानाची तयारी सुरू केली असून सर्व गोष्टींचे तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- वैभव नावडकर (निवडणूक निर्णय अधिकारी, गोकुळ)