कोल्हापूर : कोरोना संसर्ग संकटकाळात नव्याने दाखल होणाऱ्या बंदीजनांसाठी आयटीआय वसतिगृहात आपत्कालीन कारागृहाची सुरुवात करण्यात आली. या कारागृहात पहिल्या दिवशीच, शनिवारी १५ नव्या न्यायालयीन बंदीजनांना ठेवण्यात आले. १५ दिवस क्वारंटाईननंतर त्यांना बिंदू चौक उपकारागृह अगर कळंबा कारागृहात स्थलांतरित करण्यात येणार आहे.कोरोनाचा संसर्ग राज्यातील काही कारागृहांत झाला आहे. त्यामुळे सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा लागलेल्या बंदी व न्यायालयीन बंदीजनांना न्यायालयाच्या परवानगीने पॅरोलवर सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे त्यांची कारागृहातील संख्या कमी झाली.
बिंदू चौक उपकारागृहातील सर्व बंदी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील स्वतंत्र कक्षात स्थलांतरित केले आहेत. त्यांची तपासणी करण्यात आली आहे. नव्याने येणाऱ्या बंदीजनांची तपासणी करूनच त्यांना बिंदू चौक उपकारागृहात प्रवेश दिला; पण बिंदू चौक उपकारागृहाची क्षमता १२५ ते १३० आहे. त्यामुळे आयटीआय मुलांच्या वसतिगृहात नव्याने येणाऱ्या २०० बंदीजनांसाठी आपत्कालीन कारागृह सुरू केले.