कोल्हापूर: लॉकडाऊनच्या या काळातील परिस्थिती पाहता पालकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज असताना फी वसूली केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
२०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी पालकांकडून सक्तीने शैक्षणिक फी वसूली केल्यास संबंधित शैक्षणिक संस्था अध्यक्ष, सचिवासह मुख्याध्यापक यांना जबाबदार धरुन कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.शनिवारी लोहार यांनी संस्था अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांना पत्र काढून कारवाईची इशारा नोटीस लागू केली आहे. कोरोनाच्या या काळात आर्थिक संकट असताना शाळा व संस्थाकडून प्रचंड प्रमाणात डोनेशनची मागणी केली जात आहे.
याविरोधात शिवसेनेचे माजी आमदार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ऑल इंडीया स्टुडन्ट फेडरेशनतर्फे दोन दिवसापुर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले होते. याची दखल घेत शिक्षणाधिकारी लोहार यांनी ही कारवाईची नोटीस बजावली आहे.