कोल्हापूर : तिरूपती बालाजी मंदिर आज, सोमवारपासून खुले झाले आहे. या निर्णयामुळे करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर खुले होण्याच्या प्रतीक्षेत येथील भाविक आहेत. मात्र, राज्य शासनाने ३० जूनपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानंतरच मंदिर खुले करण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दिली आहे.देशात ८ जूनपासून अनलॉकचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यामध्ये धार्मिक स्थळे काही अटींवर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे तिरूपती बालाजी मंदिर आज, सोमवारपासून सुरू झाले आहे. रोज सहा हजार भाविकांनाच दर्शनासाठी परवानगी दिली आहे. ऑनलाईन तिकीट बंधनकारक केले आहे. तसेच दर्शनाची वेळही निश्चित केली आहे.
याच धर्तीवर अंबाबाई मंदिर सुरू होईल, अशी अपेक्षा भाविकांना होती. मात्र, राज्यात कोरोना विषाणूच्या बाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने, केंद्र शासनाने दिलेले काही निर्णय राज्यात लागू केलेले नाहीत. यामध्ये धार्मिक स्थळे ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश आहेत. त्यामुळे भाविकांना आणखी काही दिवस महाद्वार चौकातूनच दर्शन घ्यावे लागणार, असे सध्या तरी चित्र आहे.
तिरूपती मंदिर जरी खुले झाले असले तरी तो त्यांच्या राज्य शासनाने घेतलेला निर्णय आहे. महाराष्ट् शासनाने ३० जूननंतर जरी मंदिर खुले करण्याचे आदेश दिले तरी समितीची बैठक घेऊन कशा पद्धतीने दर्शन सुरू करायचे याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी ३० जूनपर्यंत मंदिर सुरू करण्याची घाई केली जाणार नाही.- महेश जाधव,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
राज्य शासनाने ३० जू्नपर्यंत मंदिर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाचे आदेश आल्यानंतरच त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे मंदिर खुले केले जाईल.- विजय पोवार, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती