कोल्हापूर : बसस्थानक, रेल्वे स्टेशन, व्यापारी पेठ, चित्रपटगृहे, हॉटेल, आदी ठिकाणी नेहमी असणारी गर्दी रविवारी कोरोनाच्या धास्तीमुळे कमी दिसली. एकूणच शहरात बंदसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्येही कमालीच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. पर्यटनाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे नेहमी गजबजलेले कोल्हापूर शहरात रविवारी सुट्टी असूनही शुकशुकाट पाहण्यास मिळाला. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशाही सूचना केल्या आहेत. परिणामी, भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी खरेदीसाठी लोक मास्क घालूनच आले होते.सराफी बाजारपेठ असलेल्या गुजरीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ‘कोरोना व्हायरस’मुळे शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. येथील कोट्यवधीचे व्यवहार ठप्प आहेत.कळंबा कारागृहात विदेशींसह नव्या कैद्यांसाठी स्वतंत्र बराक‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर कारागृहातही दक्षता घेतली जात आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृह, बिंदू चौक उपकारागृहातही दक्षतेसाठी योग्य पावले उचलली गेली आहेत. त्यासाठी तेथे कैदी व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मास्कचे वितरण केले. तर नव्याने येणारे कैदी आणि परदेशी कैद्यांसाठी कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्वतंत्र बराक निर्माण केले आहे. या स्वतंत्र बराकमधील कैद्यांवर पंधरा दिवस विशेष लक्ष देण्यात येत आहे.‘कोरोना’च्या धास्तीमुळे कारागृह प्रशासनही सावध झाले.अंबाबाईचे भाविकही घटलेकोल्हापूर : ‘कोरोना’च्या धास्तीने करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून येणाºया भाविकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. वाडीरत्नागिरी येथील जोतिबाचे मंदिरही प्रशासनाने रविवारी पहाटेपासूनच बंद केले होते. त्यामुळे भाविकांना दक्षिणद्वारामधील कमानीच्या बाहेरूनच कळसाचे दर्शन घ्यावे लागले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या हाताला सॅनिटायझर लावूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. याकरिता देवस्थानने ८० लीटर सॅनिटायझरचा साठा केला आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे हीच संख्या रविवारी दिवसभरात २७०० ते ३००० वर आली आहे.बाळूमामांचे दर्शनही बंदरोज श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवाच्या दर्शनासाठी किमान रोज पाच हजार भाविक येतात. ही संख्या लक्षात घेऊन तहसीलदारांच्या आदेशानुसार मंदिर प्रशासनाने रविवारपासून शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.रेल्वे स्टेशनमध्ये शुकशुकाटनेहमी प्रवाशांनी गजबजलेले असलेले रेल्वे स्टेशन रविवारी ओस होते. तिकीट कक्षाजवळ तुरळक प्रवासी होते. रेल्वे येण्याच्या वेळी रिक्षांची रांगही रविवारी नव्हती. त्यामुळे दिवसभर या ठिकाणी शुकशुकाट होता. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये रोज हजारो प्रवासी येतात. ‘कोरोना व्हायरस’मुळे प्रवाशांनी घरातच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे बसस्थानकामध्ये एस.टी. चालक आणि वाहक अक्षरश: प्रवाशांच्या प्रतीक्षेत होते. काही एस. टी. बस रिकाम्याच बाहेर पडल्या.अफवा पसरविणाºया मुलाविरुद्ध गुन्हा दाखलमुंबई : कोंबडी किंवा अंडी खाल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होते, अशी अफवा सोशल मीडियावर पसरवणाºया दोघांचा तपास सायबर ब्रँचने लावल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली. सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांच्या मुळाशी जाऊन सरकार कारवाई करत आहे, अशा संकटाच्या काळात अफवा पसरवणारे गजाआड जातील, असेही ते म्हणाले. सायबर पोलिसांनी जे दोन आयपी अॅड्रेस शोधले त्यातील एक उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील १६ वर्षे वयाचा मुलाचा निघाला. तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात त्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.विवाहाचा खर्च कोरोना आपत्तीसाठीवडवणी (जि. बीड) : चौसाळ्याचे माजी आ. केशवराव आंधळे यांचे कनिष्ठ बंधू शंकरराव आंधळे यांचे पुत्र मयुर व शिरुर कासार येथील त्र्यंबकराव खेडकर यांची कन्या अमृता यांचा रविवारी साखरपुडा होता. यावेळी दोन्ही परिवारातील सदस्यांची बैठक झाली. कोरोना आपत्ती व्यवस्थापनासाठी एक लाख रुपयांचा निधी देऊन आजच विवाह करायचा असा निर्णय बैठकीत झाला. तो माजी आ. केशवराव आंधळे यांनी सर्वांसमक्ष बोलून दाखवला. या निर्णयाचे कुटुंबियांनी व मित्र परिवाराने स्वागत केले.
Coronavirus : कोरोनामुळे कोल्हापुरात शुकशुकाट, कोट्यवधींची उलाढाल ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 5:34 AM