कोल्हापूर : सुमारे तीन महिने बंद असलेले जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात सुरू झाली. कोल्हापूरातील न्यायसंकुलात आवारात वकिल व मोजक्याच पक्षकारांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली. दिवसभरात सुमारे साडेतीनशेहून अधिक वकील आणि पक्षकारांनी हजेरी लावली. प्रत्येकाची नोंद करुनच मास्क आणि सॅनिटायझर करूनच न्यायालयाच्या आवारात प्रवेश दिला जात होता.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तीन महिने न्यायालयीन कामकाज बंद झाले होते. फक्त अत्यावश्यकसाठी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज सुरु राहीले. सोमवारपासून न्यायालयाचे अंशत: कामकाज सुरु झाले. पहिल्याच दिवशीच्या पहिल्या सत्रात वकीलांनी अधिक गर्दी होती.
सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यतच्या पहिल्या सत्रात दिवाणी तर दुपारी अडीच ते साडेपाच वाजेपर्यतच्या दुसऱ्या सत्रात फौजदारी खटले सुनावणीस घेण्यात येणार होते. प्रत्येक न्यायाधीशांकडे केवळ पंधरा सुनावण्या घेण्यात येणार होते. पहिल्या दिवशी कोणत्या खटल्यांची सुनावणी होणार याबाबतची माहिती बार असोसिएशनला दिली होती. त्यानुसार त्याची माहिती वकीलांपर्यत देण्यात आली होती, ज्यांच्या खटल्याची सुनावणी होणार त्यांनाच न्यायालयात प्रवेश देण्यात येणार होता. पण पहिल्या दिवशीच बहुतांशी वकिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.