संतोष मिठारीकोल्हापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शाळा सुरू करण्याची घाई शासनाने करू नये. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा. दि. १५ जुलैपासून शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असे मत कोल्हापुरातील पालक, शिक्षकांतून व्यक्त होत आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने दि. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने पालक, शिक्षकांची मते जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढत आहे. त्याची तीव्रता वाढणार की, कमी होणार याबाबत सध्या काहीच सांगता येत नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्या, तरी पालक त्यांच्या पाल्यांना पाठविणार का? हा प्रश्न आहे.
विविध शाळांमधील विद्यार्थी संख्या लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे, दोन सत्रांमध्ये शाळा भरविणे, आदी अडचणीचे ठरणारे आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत शाळा सुरू करू नयेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू करावे. या मुद्याचा विचार करून शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी पालक, शिक्षकांतून होत आहे.
बहुतांश शाळांतील विद्यार्थी संख्या लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे शक्य नाही. शासनाने शैक्षणिक वर्ष दि. १५ जुलै ते ३१ मे असे करावे. दिवाळी, उन्हाळी सुट्टी कमी करता येईल. तशी मागणी आम्ही शासनाकडे करणार आहे.-दत्ता पाटील, सचिव, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ
दहा वर्षांखालील मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याने त्यांनी घराबाहेर पडू नये, असे सरकार एकीकडे सांगत आहे. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षा विचारात घेऊनच सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा.-धनश्री निकम, पालक, शाहूपुरी
कोरोनाचा धोका संपुष्टात येत नाही तोपर्यंत शाळा सुरू करू नयेत. शाळा सुरू करण्याबाबतच्या काही विनंतीवजा सूचना, उपाययोजना आम्ही शासन, शिक्षण विभागाला पत्राद्वारे केल्या आहेत.-संतोष आयरे, राज्य उपाध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ.
नवीन शैक्षणिक वर्ष आणि शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश शासनाकडून दोन दिवसांमध्ये प्राप्त होतील. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
१५ जूनपासून शाळा सुरू करण्यातील अडचणी
- बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अधिक असल्याने सोशल डिस्टन्सिंंग राबविणे.
- प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकत्रित असणाऱ्या ठिकाणी सत्र पद्धतीने शाळा भरविणे.
- ई-लर्निंगची साधने नसणाऱ्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षण पद्धती राबविणे.
- संस्थात्मक अलगीकरणासाठी उपलब्ध करून दिलेल्या २००४ शाळांचे निर्जंतुकीकरण करणे.
- खासगी प्राथमिक शिक्षक संघाने सुचविलेल्या उपाययोजन
- जास्त पटाचे वर्ग एक आड एक दिवस भरवावेत.
- सर्व विद्यार्थ्यांना रोगप्रतिबंधक लस अथवा प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्या द्याव्यात.
- पूर्व प्राथमिकच्या वर्गांची वेळ दुपारी १२ ते सायंकाळी ५ अशी करावी.
- इंटरनेट सुविधा नसलेल्या ठिकाणी दूरदर्शन, स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून शैक्षणिक व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे.
- जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
- इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये : ३४२९
- एकूण विद्यार्थी संख्या : ५ लाख ६४ हजार २५२
- महापालिका हद्दीतील शाळा : ५९
- एकूण विद्यार्थी संख्या : ९५००