कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली हॉटेल्स आज, सोमवारपासून सुरू करण्यास केंद्र सरकारने मुभा दिली आहे; पण राज्य शासनाने त्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे परवानगी देण्याच्या शासनाच्या आदेशाची कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकांना प्रतीक्षा लागली आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील हॉटेल, उपाहारगृहांमधील पार्सल सुविधा १० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. २४ मार्चपासून कोल्हापुरातील हॉटेल, नाष्टा सेंटर, रेस्टॉरंट, आदी बंद करण्यात आले. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात जेवण, नाष्टा यांची पार्सल आणि होम डिलिव्हरीची सुविधा सुरू झाली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ही सेवा सुरू राहील. अन्य व्यापार, व्यवसायांप्रमाणे हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी या व्यावसायिकांकडून होऊ लागली. मात्र, या मागणीला केंद्र सरकारकडून अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सशर्त परवानगी मिळाली आहे.
लॉकडाऊनच्या सुरुवातीला शहरात दोन टक्के हॉटेलमध्ये पार्सल सुविधा सुरू होती. सध्या सुमारे १०० हॉटेलमध्ये ती सुरू आहे, उर्वरित रेस्टॉरंट, हॉटेलमधील सेवा बंद आहे. केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास मुभा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याची तयारी हॉटेल व्यावसायिकांकडून सुरू आहे. त्यात गावी गेलेल्या कामगारांना बोलाविणे, साफसफाई करणे, पावसाळ्यातील नियोजन म्हणून धान्यखरेदी, इमारतीची डागडुजी, आदींचा समावेश आहे.
हॉटेल व्यवसाय सुरू झाल्यानंतर अर्थचक्राची गती वाढण्यास मदत होईल. ई-सिस्टीम राबवून, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केल्याने पार्सल सुविधा सेवा सुरळीतपणे पार पडली. यापुढेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व्यवसाय करण्यात येईल. ते लक्षात घेऊन राज्य शासनाने हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी.- उज्ज्वल नागेशकर,अध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ
हॉटेल, पर्यटन व्यवसायांतून होणाऱ्या रोजगार निर्मितीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे कामगारांबरोबर अनेक मालकही बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे हे व्यवसाय लवकर सुरू होणे आवश्यक आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून व्यवसाय करण्यात येईल.- आनंद माने, हॉटेल व्यावसायिक
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट - १५००
- जिल्ह्यातील संख्या - सुमारे ३७००
- कामगारांची संख्या - सुमारे २५०००
- सध्या पार्सल सुविधा पुरविणारी हॉटेल्स - १००