कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, सोमवारी सायंकाळपर्यत सुमारे ३७ नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडल्याने ही संख्या ३७८ पर्यत पोहचली.
वाढती संख्यामुळे आरोग्ययंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. एकीकडे कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असतानाच सीपीआर रुग्णालयातून दिवसभरात सहा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यत सुमारे २४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. दिवसेदिवस वाढती संख्या कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यातील नागरीकांना विशेष पासवर कोल्हापूरात प्रवेश देण्यास प्रारंभ झाल्यापासून कोल्हापूरात कोरोनाबाधीतांची संख्या गेल्या १५ दिवसात वाढली आहे. रविवारी ही संख्या ३४१ वर पोहचली होती.
सोमवारी दिवसभरात सायंकाळपर्यत सुमारे ३९ अहवाल कोरोनाबाधीत प्राप्त झाले. पण या प्राप्त झालेल्या चाचणी अहवालात आजरा तालुक्यातील दोन बाधीतांचे अहवाल दुसऱ्यांदा बाधीत आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सायंकाळपर्यत कोरोनाबाधीतांची संख्या ३७८ वर पोहचली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १०४ कोरोनाबाधीत रुग्ण हे शाहूवाडी तालुक्यात आढळले आहेत.दरम्यान, आणखी सहा रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने ते कोरोनामुक्त झाले. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने त्यांना सोमवारी सायंकाळपर्यत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून आतापर्यत सुमारे २४ बाधीत रुग्ण चांगले झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सीपीआरमधील डॉक्टर व कर्मचार्यांचे हे यश आहे.