कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमधील व्हेंटिलेटरची आवश्यकता लक्षात घेऊन कोल्हापुरातील प्रतिभानगरमधील मेकॅनिकल इंजिनिअर पुष्कराज अनिल जनवाडकर यांनी माफक दरातील व्हेंटिलेटरच्या निर्मितीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी त्याचे प्रारूप तयार केले आहे. आरोग्य विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्याच्या निर्मितीची प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू होणार आहे.तपासणीसाठीची यंत्रसामुग्री (टेस्टिंग इक्विपमेंट) तयार करणाऱ्या कोल्हापूरमधील त्यांच्या व्हर्सटाईल इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून त्यांनी माफक दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या व्हेंटिलेटरचे प्रारूप तयार केले आहे. बी.ई. मेकॅनिकल असणाऱ्या पुष्कराज आणि त्यांच्या कंपनीतील अन्य सहकाऱ्यांनी आठवड्याभरात व्हेंटिलेटरची विविध १४ डिझाईन्स् तयार केली आहेत.
त्यासाठी इंटेन्सिव केअर, रुग्णांचे स्थलांतरण, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वापर आणि आंतरराष्ट्रीय निकष विचारात घेतले आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर या व्हेंटिलेटर निर्मितीचे काम प्रत्यक्षात सुरू केले जाणार आहे. माफक दरात आणि कमी वेळेत जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्याने कोरोना विरोधातील लढ्यासाठी मोठी मदत होणार आहे.व्हेंटिलेटरच्या निर्मितीसाठी विचारात घेतलेले निकषफुफ्फुसामध्ये जाणारी हवा, मिनिटात घेतले जाणारे श्वास, जास्तीत जास्त प्राणवायू मिळण्यासाठी लागणारे फुफ्फुसातील प्रेशर (पीप) आणि प्राणवायू हे कमी जास्त करण्याची सुविधा या निकषांचा विचार संंबंधित व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी केला आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटरच्या सध्याच्या उपलब्धता, दर लक्षात घेऊन माफक दरात आणि कमी वेळेत जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही गेल्या आठवड्याभरात काम केले. त्यातून व्हेंटिलेटरची १४ प्रारूप तयार केली. त्याची चाचणी घेतली असून चांगले परिणाम दिसून आले. आठ ते दहा हजार रुपये आणि ४५ हजार रुपये अशा दोन प्रकारातील व्हेंटिलेटरच्या निर्मिती करण्यात येईल. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या परवानगीसाठी व्हेंटिलेटरचे प्रारूप येत्या दोन दिवसांत पाठविण्यात येणार आहेत. ही परवानगी मिळाल्यानंतर रोज किमान पाचशे व्हेंटिलेटर तयार करण्यात येणार आहेत.- पुष्कराज जनवाडकर