कोल्हापर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून शासनाने शाळांना सुट्टी देऊन इयत्ता पहिली ते आठवीची दुसऱ्या सत्रातील परीक्षा रद्द केली. परीक्षा रद्द झाली असली, तरी सत्र दोनचे मूल्यमापन कसे करावे, निकाल कसा तयार करायचा, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील हा प्रश्न आता आकारिक पद्धतीचा पर्याय निश्चित झाल्याने मार्गी लागला आहे.मूल्यमापन, निकालाबाबत ‘आकारिक’चा पर्याय खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने शिक्षण विभागाला सूचविला होता. त्यावर दि. २० मार्च रोजी शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार सत्र दोनच्या मूल्यमापनाची कार्यवाही करावी, असे राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी व शिक्षक महासंघ संघटना यांना संदेशाद्वारे कळविले आहे.
या आदेशात इयत्ता पहिली ते आठवीच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात वर्षभर चालणाऱ्या आकारिक व साकारिक (संकलित) मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी, असे म्हटले आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे एका वर्षात सत्र एक आणि दोनमध्ये केले जाते.
सत्र दोनच्या मूल्यमापनासाठी आकारिक मूल्यमापन सर्वच शाळेत पूर्ण असल्याने आकारिक गुणांची शंभर पैकी सरासरी काढून मूल्यमापन करणे हा एकमेव पर्याय शिक्षण विभाग व शिक्षकांना योग्य वाटला. त्यामुळे सन २०१९-२० मधील सत्र दोनच्या मूल्यमापन आणि निकाल तयार करण्यासाठी आकारिक गुणांचा पर्याय निश्चित करण्यात आला आहे. या पद्धतीने निकाल तयार करण्याची सूचना महानगरपालिका, करवीर आणि कागल पंचायत समितीने पत्राद्वारे दिली आहे.
नववी, अकरावीसाठी असा पर्यायइयत्ता नववी, अकरावीतील विद्यार्थ्यांना प्रथम सत्रातील परीक्षेचे गुण तसेच चाचण्या, प्रात्यक्षिके, अंतर्गत मूल्यमापनातील प्राप्त गुणांच्या आधारावर वर्गोन्नती द्यावी. विद्यार्थ्यांना शाळेत न बोलविता निकालाच्या वितरणाचे नियोजन शाळांनी करावे, अशी सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली आहे.
सत्र दोनचे मूल्यमापन कसे करावे याबाबतचा ‘आकारिक’चा पर्याय महासंघाने सूचविला. ‘लोकमत’ने सविस्तरपणे मांडला. शिक्षण विभागाने त्यावर सकारात्मक कार्यवाही केल्याबद्दल आभार मानतो.-संतोष आयरे, राज्य कार्याध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ
आकारिक मूल्यमापनदैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, प्रात्यक्षिक, प्रयोग, उपक्रम कृती, प्रकल्प, चाचणी परीक्षा यांचा समावेश असणाºया मूल्यमापनाला आकारिक म्हटले जाते.