कोल्हापूर : कोरोना व्हायरसच्या धोक्याची पर्वा न करता महापालिकेने स्वच्छता मोहीम सुरूच ठेवली आहे. नाले स्वच्छता व औषध फवारणीसोबत परिसरातील स्वच्छता करण्यात आली. दिवसभरात ५ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला.
मोहिमेचा ५१वा रविवार असून, या अभियानामध्ये महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंन्स ठेवून मोहिमेत सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम पार पडली.यल्लम्मा मंदिर, रिलायन्स मॉल नाला, हुतात्मा पार्क नाला परिसर, जयंती नदी, संप आणी पंप हौस व संभाजीनगर मेन रोड याठिकाणी राबविण्यात आली. त्याचबरोबर तीन पोकलॅन्डच्या साहाय्याने रिलायन्स मॉल मागे, मनोरा हॉटेल, रामानंदनगर नाल्यातील गाळ काढण्यात येत आहे.
या मोहिमेत ४ जेसीबी, ५ डंपर, ६ आरसी गाड्या, ८ ट्रॅक्टर व ३ टँकरद्वारे औषध फवारणी करण्यात आली. यावेळी शाखा अभियंता आर. के. पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, अमित देशपांडे उपस्थित होते.नागरिकांशिवाय मोहीमआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. लहानांपासून वरिष्ठांपर्यंत नागरिक सहभागी होतात. संचारबंदी असल्यामुळे गेल्या महिन्यांपासून नागरिकाशिवाय मोहीम सुरू आहे. महापालिकेच्या ६० स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने रविवारी मोहीम राबविण्यात आली.