कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयं-साहाय्यता बचत गटातील महिलांनी ७५ हजार मास्क तयार केले आहेत. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर सामाजिक बांधीलकीतून या मास्कचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे यांनी येथे दिली.झिंजाडे म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी माविमच्या स्वयंसाहाय्यता महिला बचत गटांनी ग्रामीण व शहरी भागांत विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.
बचत गट, ग्राम संस्था वस्ती स्तर संघ व लोकसंचलित साधन केंद्रांच्या माध्यमातून प्रती महिला एक रुपया याप्रमाणे २२ हजार रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्यात आले आहेत. तसेच महिला बचत गटांनी आपल्या कार्यक्षेत्रात गरीब, गरजू तसेच लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी व गरजूंना मोफत जेवण, गरजूंना अन्नधान्य, सॅनिटायझरही वितरित केले आहे.