कोल्हापूर : तब्बल साठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूरची सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने संभाजीनगर रेसकोर्स येथील छत्रपती संभाजीराजे विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर नेमबाजीच्या सरावास सुरुवात केली. शनिवारी तिच्यासह अनुष्का पाटील आणि अभिज्ञा पाटील या नेमबाजानीही सराव केला.
लॉकडाऊन चार मधील अटी व शर्थीनुसार क्रीडांगणांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून ऑलंम्पिकसह विविध आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेल्या सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, अभिज्ञा पाटील, स्वरूप उन्हाळकर, शाहू माने या खेळाडूंनाही सराव करण्यास मुभा देण्यात आली आहे.
त्यानुसार कोल्हापुरातील संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील २५ मीटर शूटिंग रेंज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने खुली केली आहे. त्यानुसार सकाळी नेमबाज राही सरनोबत हिने तीन तास या शूटिंग रेंजवर सराव केला. त्यात तिने पॉईट टू टू पिस्तूलमधून सराव केला. या सर्व नेमबाजांकरिता जिल्हा क्रीडा कार्यालयाने रेंज सुसज्ज केली.
लॉकडाऊनच्या काळात घरामध्ये सराव करीत होते. मात्र, स्पर्धेचे वातावरण तयार होण्यासाठी रेंजवर सराव करणे महत्त्वाचे असते. क्रीडा कार्यालयाने सराव करण्यासाठी मुभा दिल्यामुळे आनंद झाला.- राही सरनोबत, आंतरराष्ट्रीय नेमबाज