कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एखाद्या पहाडासारखे सामोरे गेले आहेत, हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विसरू नये, असे प्रत्युत्तर भाजपच्या वतीने देण्यात आले.
कोरोनाच्या संकटात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कोल्हापूरची माणसे जगली की मेली हे तरी बघायला यावे, अशी टीका मुश्रीफ यांनी केली होती. पक्षाच्या तातडीच्या बैठकीत मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.निवेदनात म्हटले आहे, विविध समारंभांमध्ये केवळ आणि केवळ चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याशिवाय ज्यांचे राजकारण पुढे जात नाही, अशा मुश्रीफ यांनी महाराष्ट्र कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहे, याचा काळ आणि वेळ ओळखून राजकीय टीकाटिपण्णी बंद करावी.
आपण ग्रामविकास मंत्री म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा विचार करणे गरजेचे असताना, त्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी राजकारणाच्या खालच्या पातळीवर जाऊ नये. पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना महाराष्ट्राचा विचार करावा लागतो. त्यामुळे त्यांचा सतत प्रवास सुरू असतो.
याउलट आपण अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या जिल्ह्यास किती न्याय दिला व पालकमंत्री म्हणून काम करत असताना कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, याचे मार्गदर्शन पाटील यांच्याकडून घ्यावे असे सूचित करावेसे वाटते. महापुरामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी पाटील यांनी जी मदत केली, ती आजपण लोकांच्या लक्षात आहे.मुश्रीफ कायम लक्ष्मीदर्शनाचाच मुद्दा काढतात. हे अनाकलनीय असून पाटील यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी सत्तेचा उपयोग किंवा त्याची गरिमा राखण्याचे काम केले, हे कोल्हापूरची जनता चांगल्या पद्धतीने जाणते. जनसेवा करीत असताना किंवा संकटामध्ये अडकलेल्या लोकांना मदत करत असताना पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श ठेवून त्यांचे जीवन सुकर केले.
यावेळी त्यांनी प्रसिद्धीचा हव्यास केला? नाही; पण मंत्री मुश्रीफ यांनी स्वत:चा स्वयंघोषित श्रावणबाळ असा उल्लेख लावून कोणता आदर्श निर्माण केला? सरकार तुमचे, तुम्ही मंत्री, सर्व यंत्रणा तुमच्या अधीन असे असताना लोकांना मदत करायची सोडून सातत्याने पाटील यांच्यावर टीका करून आपल्या पक्षप्रमुखांची वाहवा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला? आहे.पाटील यांनी ते मंत्री असताना अवनि, सावली, स्वयंसिद्धा या सेवाभावी संस्थांना मदत केली. अनेक खेळाडूंना खेळांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी मिळवून दिल्या. अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया, औषधोपचारांसह सर्व व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिल्या.
अशा प्रकारे सामाजिक भान ठेवून गरजू लोकांना मदत केली तर अशा विधायक कामाला लक्ष्मीदर्शन म्हणणे योग्य आहे का, असा सवाल देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी उपस्थित केला.कोरोना संकटातही कामकोरोनाच्या संकटात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने गरीब लोकांसाठी अन्नधान्य वाटप, जेवण पुरवणे, मास्क, सॅनिटायझर तसेच वैद्यकीय सुविधा पुरवणे असे उपक्रम सुरू आहेत. सी.पी.आर. रुग्णालयाला महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी भाजपच्या वतीने एक हजार मास्क दिले आहेत. हे काम करीत असताना पाटील हे कोल्हापुरात नाहीत, हे म्हणणे चुकीचे आहे.