राम मगदूम
गडहिंग्लज : गडहिंग्लजच्या नव्या प्रभाग ९ चे नूतन नगरसेवक महेश उर्फ बंटी कोरी यांनी आपल्या वार्डातील गोरगरीबांना रास्त भावात जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी येथील बिरोबाच्या देवळात स्वस्त धान्य दुकान सुरू केले आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत नफेखोरीचा प्रकार सर्रास अनेक ठिकाणी सुरू असतानाच ‘बंटीदा’च्या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.या प्रभागात काळभैरी रोडवरील डोंबारी वसाहतीसह मेटाचा मार्ग व दुंडगा मार्गावरील बेघर व भूमीहीनांची झोपडपट्टीदेखील आहे. खासकरून त्यांच्यासाठीच त्यांनी हे फिरते दुकान सुरू केले आहे. ना नफा..ना तोटा तत्वावर सुरू झालेले हे दुकान ठराविक दिवशी ठिकठिकाणी लावले जाणार आहे.गडहिंग्लज शहरातील होलसेल किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या जातात. त्याची वाहतूक ते स्वत: करतात. देवळातील दुकानात पॅकींग आणि विक्रीची सेवा संदीप पाटील, सूरज गवळी, अशोक माळगी व सुशांत पोवार हे विनामोबदला करत आहेत.बंटीदा ग्रुपतर्फे कोरोनाची साथ आपल्यापासून आजअखेर हातावर पोट असणाऱ्यांना तांदूळ, डाळ, बटाटे, कांदे आदी वस्तूचे ३६५ कीट मोफत वाटण्यात आले आहेत. दरम्यान, रक्तदान शिबीर झाले, नगरपालिका व पोलिस ठाण्यासमोर सॅनिटायझर झोन बुथ उभारण्यात आला आहे. त्यानंतरचा हा चौथा उपक्रम आहे. वस्तूंचे दर प्रतिकिलो असेतांदूळ २५ ते ३६ रूपये साखर ३६, तूरडाळ ९०, खाद्यतेल ९५, मूगडाळ १२६, शाबूदाणा ७०, पोहे ४५ असे येथील दर आहेत. ३ दिवसात ५२० लोकांनी ८९ हजाराची खरेदी केली आहे.
बाजारपेठेपासून दूर राहणाऱ्या गरीबांची पायपीट होवू नये, अडचणीच्या काळात त्यांना किमान धान्य तरी रास्त भावात मिळावे म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे.- महेश कोरी, नगरसेवक.