कोल्हापूर : मुंबई-पुण्यात वाढलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये नियमांचे पालन करून चित्रीकरण करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे कोल्हापुरातील चित्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर चित्रनगरीतील दुसऱ्या स्टुडिओ उभारणीच्या कामाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे.मुंबई-पुण्यात कोरोनाने कहर केल्याने तेथील रखडलेले चित्रपट, मालिका व जाहिरातींचे चित्रीकरण कोल्हापूरला आणण्याासाठी येथील सिने व्यावसायिकांनी प्रयत्न सुुरू केले आहेत. दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कलाकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
यावेळी त्यांनी ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये दक्षता घेऊन व सर्व नियम पाळून मर्यादित स्वरूपात का होईना चित्रीकरण कसे सुुरू करता येईल याचा विचार करूया, असे आश्वासन दिले. मात्र, त्यासाठी कॅन्टॉन्मेंट झोनमध्ये चित्रीकरण स्थळे नाहीत ना, टीमधील लोकांची संख्या, त्यांचे राहणे-जेवणे यांचा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.सध्या मुंबई-पुणे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आता केवळ कोल्हापुरात तातडीने चित्रीकरण होऊ शकते; कारण येथे कोल्हापूर चित्रनगरीसारखा स्टुडिओ आहे. येथेच कलाकार, लेखक, दिग्दर्शकांपासून ते बॅकस्टेज, नेपथ्य, स्पॉटबॉय, लाईटमन, वेशभूषा, तंत्रज्ञ यासह चित्रीकरणासाठीची सगळी साधने उपलब्ध आहेत. शिवाय येथे आधीपासूनच तीन मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळे शासनाने अधिकृतरीत्या जाहीर केल्यानंतर या तीन मालिकांपासूनच चित्रीकरणाची सुरुवात होणार आहे.