इचलकरंजी : किरकोळ कारणावरून येथील लालनगरमधील रेशनधान्य दुकानदार आणि ग्राहकात हाणामारी झाली. यावेळी संतप्त ग्राहकाने दुकानातील टेबल, खिडक्या आदीसह साहित्याची मोडतोड केली. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. त्याामुळे जवळच असलेल्या गावभाग पोलिसांनी तेथे धाव घेत हस्तक्षेप केला व गर्दी हटविली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.नेहमी धान्य न मिळणाऱ्या केशरी शिधापत्रिकाधारकांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर 12 रुपये प्रमाणे गहू व 8 रुपये किलोने तांदूळ देण्यास शनिवार 25 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. येथील लालनगर परिसरात विनोद आवळे यांचे रेशनधान्य दुकान आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी त्याठिकाणी नफिसा शेख या धान्य आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आवळे यांनी माझ्याकडे फक्त तांदूळ आले आहे. आज किंवा उद्या गहू येणार असल्याने सोमवारपासून सर्वांना धान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कारणावरुन आवळे व शेख यांच्यात वाद झाला. त्या वादाचे पर्यावसान शिवीगाळ व हाणामारीत झाले. त्यातून शेख यांचा मुलगा अजीज व आवळे आणि त्यांची आई बेबी यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. यावेळी शेख याच्यासह त्याठिकाणी असलेल्या काहीजणांनी आवळे यांच्या दुकानातील टेबल, खिडकीसह अन्य साहित्याची तोडफोड करुन नुकसान केले. त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला.
याबाबतची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला पांगविले. तसेच विनोद आवळे व अजीज शेख यांना ताब्यात घेतले. या दोघांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हे दाखल केले असून दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सपोनि गजेंद्र लोहार यांनी दिली.दुकान निश्चित वेळेत न उघडल्याने संतापलॉकडाऊन काळात इचलकरंजी शहर परिसरात सर्वच रेशनधान्य दुकान सकाळी 6 ते 10 या कालावधीत सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असतानाही इचलकरंजी-चंदूर रस्त्यावरील शाहूनगर भागातील रेशनधान्य दुकान शनिवारी सकाळी उशीरापर्यंत उघडण्यात आले नव्हते. सदरचे दुकान निश्चित वेळेत न उघडल्याने या दुकानासमोर पहाटेपासूनच रांगा लावून बसलेल्या ग्राहकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. याबाबत माहिती मिळूनही पुरवठा विभागाने कारवाई केली नव्हती.