कोल्हापूर : भाजी विक्रेत्यांनी आणि नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग तसेच शासनाचे नियम पाळले नाहीत तर नाइलाजाने शहरातील भाजीविक्री बंद करावी लागेल, असा इशारा महापौर निलोफर आजरेकर यांनी बुधवारी दिला. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी तर यापुढे मास्क व हॅँडग्लोव्हज न वापरणाऱ्या दुकानदार व भाजी विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला.भाजी विक्रेते सोशल डिस्टन्सिंग पाळून भाजीविक्री करीत नसल्याचे शहरात दिसून येत आहे. त्याचबरोबर नागरिकही भाजी घेण्यास गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो; म्हणून यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त व पदाधिकारी यांची बैठक पार पडली.यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे, महिला व बालकल्याण सभापती शोभा कवाळे, हसिना फरास, रिना कांबळे, गटनेता शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, रावसाहेब चव्हाण, बाबूराव दबडे, इस्टेट आॅफिसर सचिन जाधव, आश्पाक आजरेकर, महेश उत्तुरे उपस्थित होते.