कोल्हापूर : केएमटीची बससेवा सुरू करण्याची परवानगी मिळण्याबाबात केएमटी प्रशासनाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मागणी केली आहे. टप्प्याटप्प्याने बस सुरू करणे शक्य असल्याचे यामध्ये म्हटले आहे.लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून केएमटीची बस सेवा बंद आहे. केंद्र शासनाने सध्या लॉकडाऊन शिथिल केला आहे. तसेच व्यवसाय सुरू झाले आहेत. येथील कामगारांना, तसेच उपनगरांतील नागरिकांसाठी केएमटी सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
गुरुवारी सर्व पक्षीय कृती समितीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेऊन केएमटी सेवा सुरू करण्याची मागणी केली. जर विमान सेवा सुरू होत असेल तर केएमटी का नाही, असा सवालही केला.या पार्श्वभूमीवर केएमटीचे परिवहन व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे बससेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, २४ मार्चपासून बस सेवा बंद आहे.
कोल्हापूर जिल्हा नॉन रेडझोनमध्ये आहे. सध्या लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे दुकाने, व्यवसाय सुरू झाले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी केएमटीची बससेवा सुरू करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी देसाई यासंदर्भात निर्णय घेणार आहेत.