कोल्हापूर : कोल्हापुरात चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता विविध लोकेशन्सची पाहणी, कॅमेरा सेटिंग, कलाकारांकडून तालीम अशी प्राथमिक पातळीवरची तयारी सुरू झाली आहे. कोल्हापुरातील सिने व्यावसायिकांनी महिनाभर केलेल्या प्रयत्नांना यश येऊन शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी दिली. यामुळे स्थानिक व्यावसायिकांना तातडीने, तर मुंबई-पुण्यातील व्यावसायिकांना आरोग्यासंबंधीच्या नियमावलीची पूर्तता करून हे चित्रीकरण सुरू करता येणार आहे.
त्यामुळे व्यावसायिकांनी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे थांबलेल्या चित्रपट, मालिका, जाहिराती, वेब सीरिज अशा विविध माध्यमांतील चित्रीकरणाची तयारी सुरू केली आहे.
मंगळवारी सोनतळी स्काऊट बंगला येथे चित्रीकरणासाठीची चाचपणी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चित्रीकरण करताना काही अडचण येत नाही ना, तसेच संवाद, अभिनय, कॅमेरा ॲंगल याची टेस्टिंग घेण्यात आली.