कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे गेल्या ५८ दिवसांपासून बंद राहिलेल्या लालपरी (एसटी) ची चाके शुक्रवारपासून पूर्ववत धावू लागली. शहरात रिक्षा वाहतूकही सुरू झाली. वाहतुकीची सुविधा सुरू झाल्याने प्रवाशांना, तर रोजगार पुन्हा सुरू झाल्यामुळे रिक्षा चालक, एसटीचे चालक आणि वाहकांना दिलासा मिळाला.
जिल्हा प्रशासनाच्या अटींचे पालन करून प्रवासी वाहतुकीची सुरूवात झाली. मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी अकरा वाजता इचलकरंजीला एसटी रवाना झाली. त्यात नऊ प्रवासी होते.जिल्ह्यातील कोल्हापूर, इचलकरंजी, कुरूंदवाड, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, आजरा, आदींसह नऊ आगार (डेपो) सुरू, तर मलकापूर, गगनबावडा, राधानगरी आगार बंद राहिले. कोल्हापूर, इचलकरंजी, कुरूंदवाड, जयसिंगपूर, गडहिंग्लज मार्गावर दिवसभरात एकूण बारा फेऱ्यांतून ८७ जणांनी प्रवास केला.
एसटीत एका आसनावर एक प्रवासी बसले होते. आजरा, कागलला प्रवासी मिळाले नाहीत. प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळाला. बसस्थानक, आगार येथे चालक, वाहक हे प्रवाशांच्या प्रतिक्षेत थांबून होते. दरम्यान, प्रशासनाने परवानगी दिल्यानुसार एक चालक आणि दोन प्रवासी याप्रमाणे रिक्षा वाहतूक सुरू झाली. त्यामुळे शहरातील विविध मार्गांवर रिक्षा दिवसभर धावत होत्या. काही ठिकाणी रिक्षा चालकांना किमान दीड ते दोन तास प्रवाशांची प्रतिक्षा करावी लागली.