कोल्हापूर : निगेटिव्ह अहवालानंतर कऱ्हाड येथून रुकडीत परतलेल्या प्रथमेश लोहार या विद्यार्थ्याला खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी स्वत:चे घर देऊन आपुलकी गृह या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून बुधवारी केली. क्वारंटाईनसाठी प्रत्यक्ष कृतीतून स्वत:चे घर देणारे ते देशातील पहिले खासदार असतील.संस्थात्मक अलगीकरण होणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रशासनावर ताण वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून खासदार माने यांनी गावाच्या सुरक्षिततेसाठी आणि गावाच्या सहकार्यातून नव्या कोल्हापुरी पॅटर्नची संकल्पना मांडली होती. यामध्ये रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तीच्या निगेटिव्ह अहवालानंतर त्याची त्याच्याच घरी राहण्याची सोय करायची आणि घरातील सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी जाऊन राहायचे, अशी ही संकल्पना आहे.गृह अलगीकरणाच्या या संकल्पनेला आपुलकी गृहाचे नाव देत या कोल्हापुरी पॅटर्नला रुकडी (ता. हातकणंगले) येथील स्वत:चे घर देऊन खासदार माने यांनी प्रत्यक्षात उतरविले. कऱ्हाड येथील महाविद्यालयात अकरावी, बारावीचे शिक्षण घेणारा प्रथमेश हा काही दिवसांपूर्वी आपल्या गावी रुकडीमध्ये आला.
कोविड केअर सेंटरमध्ये त्याच्या स्रावाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याची खासदार माने यांनी स्वत:च्या घरी राहण्याची सोय केली. या घराच्या दरवाजावर त्यांनी आपुलकी गृह असा फलक लावला आहे. त्यावर विलगीकरण केलेल्या विद्यार्थ्याचे नाव, विलगीकरणाचा कालावधी आणि सामाजिक संदेशाचा उल्लेख आहे.
दरम्यान, खासदार माने यांनी स्वत:चे घर उपलब्ध करून दिल्याने माझ्या मनावरील ताण कमी झाला आहे, अशी भावना प्रथमेश याने व्यक्त केली. आपुलकी गृहच्या संकल्पनेची खासदार माने यांनी स्वत:पासून सुरुवात करून इतरांसाठी आदर्श निर्माण केला असल्याची प्रतिक्रिया रुकडीचे सरपंच रफिक कलावंत यांनी व्यक्त केली.