प्रवीण देसाई
कोल्हापूर : रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून कोल्हापुरात येण्यासाठी सुमारे सहा हजार १४९ जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. अजून तरी जिल्हा प्रशासनाने रेड झोनमधील कोणालाही प्रवेश न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या नोंदणी केलेल्यांबाबत शासनाकडून काही निर्णय घेतला जातो का, हे पाहावे लागेल. या व्यतिरिक्त परजिल्ह्यांसह परराज्यांतूनही कोल्हापुरात येणाऱ्यांचा ओघ मोठा आहे.जिल्ह्यातून परराज्यांसह परजिल्ह्यांत जाण्यासाठी व परराज्यांसह परजिल्ह्यांतून कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने लिंक तयार केली आहे. यावर येणाऱ्यांची व जाणाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. यामध्ये कोल्हापुरात येण्यासाठी मुंबईहून एक हजार ९४१ जणांंनी, ठाण्याहून एक हजार ९६५ जणांनी व पुण्याहून दोन हजार २४३ जणांनी नोंदणी केली आहे.
हे तीनही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याने तसेच येथून येणाऱ्यांची संख्या ही मोठी असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रेड झोनमधील कोणालाही जिल्ह्यात प्रवेश देणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. रेड झोनमधील व्यक्तींनी बाहेर जाऊ नये व त्यांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये, असे सरकारचेच निर्देश आहेत. परंतु यदाकदाचित यांना जिल्ह्यात प्रवेश देण्याचा निर्णय झाल्यास संपूर्ण जिल्ह्याचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात येण्यासाठी परराज्य-परजिल्ह्यांतील नोंदणीजिल्ह्यात येण्यासाठी गुजरातहून १८२, गोवा ११७, तेलंगणा १०३, दिल्ली ७४, मध्यप्रदेश ३३, उत्तरप्रदेश २९, तमिळनाडू ४५, राजस्थान २५, आंध्रप्रदेश येथील २५ जणांनी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर परजिल्ह्यांतून पालघर ५२५, सांगली ३७३, सातारा २१३, रायगड ३८२, सोलापूर ८३, सिंधुदुर्ग ९०, नाशिक येथील ७४ जणांनी नोंदणी केली आहे.जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी नोंदणीजिल्ह्यातून परराज्यांत जाण्यासाठी उत्तर प्रदेश ६०५१, बिहार ३७५६, कर्नाटक २७५८, राजस्थान १९८८, पश्चिम बंगाल ८६६, झारखंड ७८०, गोवा ३२४, तमिळनाडू येथील ८२ जणांची नोंदणी झाली आहे; तर परजिल्ह्यांत जाण्यासाठी पुणे १६०६, सांगली ११३६, सातारा ३०८, रत्नागिरी ३१२, मुंबई २५३, सिंधुदुर्ग २३५, लातूर १७९, नाशिक १३५, नंदुरबार येथील १३६ जणांनी नोंदणी केली आहे.