कोल्हापूर : तोंडाला मास्क, हाताला आणि साधनांना सॅनिटायझर, एकावेळी एकालाच प्रवेश अशी विशेष दक्षता घेत शुक्रवारी जिल्ह्यातील सलून आणि पार्लरचे शटर उघडले. तब्बल दोन महिन्यांनी ही दुकाने सुरू झाल्याने सलूनचालकांची आर्थिक चिंता मिटली, तर ग्राहकांचीही सोय झाल्याने त्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला.सलूनमुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरतो असे आढळून आल्याने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तातडीने ही सर्व दुकाने बंद केली. सुरुवातीला या दुकानदारांनी विरोध दर्शवला, पण वस्तुस्थिती समोर आल्यानंतर त्यांनीही स्वत:हून नियम पाळत शंभर टक्के बंद केले. पण त्यातूनही काही घरात जाऊन सेवा देण्याचाही प्रयत्न केला. शुक्रवारी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सलून आणि पार्लर सुरू करण्याची मुभा प्रशासनाने दिली. लागलीच शटर उघडून सेवा सुरूही केलीअशी घेतली विशेष दक्षताहीदुकानात गर्दी नको म्हणून एका वेळी एकालाच आत सोडले गेले. स्वत: चालकाने तोंडाला मास्क लावला, येणाऱ्या ग्राहकाला मास्क घालण्यास सांंगितले. हत्यारांना सॅनिटायझर लावून घेतले. हातांना मध्ये सॅनिटायझर लावले. टॉवेल ग्राहकाला स्वत:लाच आणायला सांगितला, ज्यांनी आणला नाही, त्यांच्यासाठी पेपर नॅपकीनचा वापर केला गेला. खूर्चीवर डेटॉलचे पाणी टाकून वारंवार पुसून घेतले गेले.
आमचा हा व्यवसाय जोखमीचा आहे, हे मान्य, पण जीवनावश्यक असतानाही दोन महिने बंद ठेवण्याची वेळ आली. बॅकांच्या हप्त्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा याची चिंता स्वस्थ बसू देत नव्हती. आता सलून सुरू झाल्याने आमची चिंता मिटली आहे. सर्व काळजी घेऊन काम सुरू केल्याचा आनंद आहे.राजेंद्र शिंदे, सलून व्यावसायिक