इंदुमती गणेशकोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क ही जीवनावश्यक बाब बनली आहे. पण हा मास्क चांदीचा असेल तर.... आहे की नाही भन्नाट कल्पना. कोल्हापुरातील सराफ व्यावसायिक संदीप सांगावकर यांनी हा चांदीचा मास्क बनवला असून नियोजित वधू-वरांच्या कुटूंबियांकडून या मास्कला मागणी येत आहे.जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने प्रत्येकाला नाका तोंडावर मास्क लावायला भाग पाडले आहे. बाजारात एन ९५ सह अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आले आहे. त्यात पुढचा प्रयोग करत गुजरी परिसरातील सराफ व्यावसायिक संदीप सांगावकर यांनी चक्क चांदीचा मास्क बनवला आहे. हा मास्क बनवण्यासाठी आठ दिवस लागले असून त्यासाठी ५० ग्रॅम चांदी वापरण्यात आली आहे. या एका मास्कची किंमत अडीच हजार रुपये इतकी आहे.या प्रयोगाबद्दल संदीप म्हणाले, लॉकडाऊनमुळे गेले दीड महिना घरी बसून होतो. अक्षय्यतृतियेचा मुहूर्तही तसाच गेला, लग्न सराईचे काही मुहूर्त शिल्लक आहेत तरी सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांकडून मोठ्या अलंकारांची खरेदी केली जात नाही. त्यामुळे लग्न सोहळ्यात घालता येईल असा आणि कोरोनाशी संबंधित विषयावरच एखादी वस्तू बनवावी असा विचार डोक्यात आला आणि मास्कची कल्पना सुचली व लागलीच बनवायला सुरुवातही केली.
आठ दिवसात खास वधू-वरांसाठी हा चांदीचा मास्क तयार झाला. या मास्कची माहिती समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर आता त्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणीही सुरु झाली आहे.
हा मास्क बनवताना वधू-वर डोळ्यासमोर ठेवले होते. तसा तो कोणालाही वापरता येतो. मात्र तो प्रतिकात्मक आहे. मेटलचा असल्याने त्याचा आकार चेहऱ्यानुसार बदलत नाही. आजूबाजुला हवा खेळती राहते त्यामुळे दैनंदिन वापरासाठी कापडी मास्क अधिक सुरक्षित आहेत.संदीप सांगावकर, सराफ व्यावसायिक, कोल्हापूर