कोल्हापूर : झारखंडमधील बोकारो येथे कोल्हापुरातून शनिवारी एका श्रमिक विशेष रेल्वेने एक हजार १४३ जण रवाना झाले. गावी जाण्याचा आनंद प्रत्येक मजुराच्या चेहऱ्यावर जाणवत होता. मजुरांना आणण्यासाठी वापरलेल्या एस.टी. बसेसची स्टेशन रोडवर मोठी रांग लागली होती.छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून शनिवारी दुपारी एक वाजता सुटलेल्या या विशेष रेल्वेला आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉ. सुप्रिया देशमुख, आयएसटीई, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर या गाड्या सोडण्यात आल्या.झारखंड राज्य शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ११४३ मजुरांची यादी करून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून बोकारोकडे ही गाडी सुटली. मंजुरी मिळालेल्या कामगारांना एस.टी. बसमधून आणण्यात आले.
या ठिकाणी प्रत्येक प्रवाशांना पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वतीने जेवण, नाष्टा आणि पाणी अशा किटचे वाटप करण्यात आले. रेल्वे सुटमध्ये स्थानकावरील उपस्थित अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. महादेव नरके, आनंदा करपे, प्रवीण पाटील, आदी उपस्थित होते.