कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मधून थोडी शिथिलता देत सरकारने शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती दहा टक्के करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी झाली.
सहकार विभाग, जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ‘जीएसटी’ कार्यालय येथे दहा टक्के उपस्थिती राहिली. तर महापालिका ८० टक्के व जिल्हाधिकारी कार्यालयात सरासरी ५० टक्के अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.राज्यासह देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने राज्य सरकारने शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती पाच टक्के ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासकीय कार्यालयांमध्ये पाच टक्के अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. परंतु सोमवारपासून सरकारने थोडी शिथिलता आणत या कार्यालयांमधील उपस्थिती दहा टक्के ठेवण्याचे निर्देश दिले.त्यानुसार सर्वच शासकीय कार्यालयांनी याची अंमलबजावणी सुरू केली.
यामध्ये अत्यावश्यक व आपत्तीशी संबंधित असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील उपस्थिती सरासरी ५० टक्के राहिली. तर महापालिकेचेही अनेक विभाग हे अत्यावश्यक सेवेत येत असल्याने येथील उपस्थिती ८० टक्के राहिली. त्याचबरोबर जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन कार्यालय, सहकार विभाग, ‘जीएसटी’ कार्यालय येथे यापूर्वी पाच टक्के उपस्थिती होती. ती आता दहा टक्के इतकी झाली आहे.