कोल्हापूर : जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी बँकेच्या लिपिकाने जिल्हाबंदी असतानाही पुणे ते कोल्हापूर असा प्रवास करीत कोल्हापूर गाठले. ही बाब पोलिसांच्या ध्यानी आल्यानंतर त्या लिपिकास क्वारंटाईन करण्यात आले. विशेष म्हणजे हा लिपिक पुणे येथेही क्वारंटाईन होता.जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित खासगी बँकेत नोकरी करणारा लिपिक पुणे येथे कामानिमित्त लॉकडाऊन दरम्यान गेला होता. त्याला कोल्हापूरला येता आले नाही. दरम्यान, पुणे परिसर सील झाल्यानंतर त्याला होम क्वॉरंटाईन व्हावे लागले.
हा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर त्याला तेथून सोडण्यात आले. मात्र, कोल्हापूरला येण्यासाठी वाहन नसल्याने त्याने बँकेच्या कॅश डिलिव्हरी व्हॅनमधून प्रवास करीत कोल्हापूर गाठले. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेत सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. तेथे त्याला पुन्हा क्वारंटाईन करण्यात आले.रमणमळा परिसरातील एका निवासी संकुलात राहणारा एकजण गुजरातहून कंटेनरमधून बसून आला. तो शुक्रवारी या निवासी संकुलात पोहचताच तेथील स्थानिकांनी त्याला प्रवेश देण्यास विरोध केला. त्यानंतर स्थानिकांनी शाहूपुरी पोलिसांना ही बाब कळविली. पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्या नागरिकास ताब्यात घेऊन सीपीआर रुग्णालयात दाखल करीत क्वारंटाईन केले.