कोल्हापूर : करवीर तालुक्यातील आरळे गावात शनिवारी (दि.२८) झालेल्या मारहाणीतील संशयित भगवान पाटील यांना १३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शेतीच्या वादातून मारामारी झाली होती.
यावेळी भगवान पाटील याने नामदेव पाटील यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले होते. तसेच हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या संदीप पाटील यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली होती. संदीप पाटील यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार २९ मार्च रोजी भगवान पाटील यांना अटक करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात आले.याबाबतची हकिकत अशी की, फिर्यादी संदीप केरबा पाटील, जखमी नामदेव नारायण पाटील (वय ४०, रा. कसबा आरळे, ता. करवीर) व संशयित आरोपी भगवान रघुनाथ पाटील (वय ४५, रा. कसबा आरळे, ता. करवीर) हे एकमेकांचे नातेवाईक असून, त्यांच्यात वडिलोपार्जित शेतजमिनींच्या आणेवारी वाटणीच्या करणावरून वाद आहे.
गावातील दसरा चौकामध्ये शनिवार, २८ रोजी सायंकाळी ४ वाजता संशयित भगवान पाटील याने संदीप पाटील यांच्या वडिलांना व नामदेव पाटील यांना शेतीच्या वाटणीच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी नामदेव पाटील हे भगवान पाटील यांची समजूत काढत होते.
याचवेळी भगवान पाटील याने नामदेव पाटील यांच्याच डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. ते रस्त्यावर खाली पडल्यामुळे त्यांना सावरण्याकरिता पुढे आलेल्या संदीप पाटील यांनाही भगवान पाटील याने शिवीगाळ केल्यामुळे संदीप पाटील यांनी तक्रार दिल्याने भगवान पाटील यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.