कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’मुळे अनेक परप्रांतीय कामगार वर्गाचे जेवणाविना हाल होत आहेत. व्हाईट आर्मीच्या माध्यमातून अशा कामगारांना दोनवेळचे घरपोच जेवण पुरविले जात आहे.उजळाईवाडी, सरनोबतवाडी, शाहू टोल नाका, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, तामगाव, नेर्ले, आदी ठिकाणी अडकून पडलेल्या कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना रोज जेवण पुरविले जात आहे. लॉकडाऊन काळात सुमारे पाऊण लाखापेक्षा जास्त लोकांना मायेचा घास भरविला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन केले आहे. अनेक कामगार कारखाने, कंपन्या बंद असल्याने घरी बसून आहेत. या संकटात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. पुणे-बंगलोर महामार्गावर अनेक चालक व वाहने अडकून पडली आहेत. हॉटेल, धाबे बंद असल्याने त्यांना जेवण मिळत नाही.
व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी परिसराचा सर्व्हे करून गजेंद्र प्रतिष्ठानचे अरविंद देशपांडे, महानगरपालिका प्रशासन यांच्या सहकार्याने अन्नछत्र सुरू केले आहे. गेल्या २१ दिवसांपासून उजळाईवाडी, सरनोबतवाडी, शाहू टोल नाका, गोकुळ शिरगाव, नेर्ले, तामगाव, कणेरीवाडी, सम्राटनगर, पंचगंगा नदीघाट, जीवबा नाना पार्क, कनाननगर, सदर बाजार, कसबा बावडा, राजारामपुरी, राजोपाध्येनगर, कदमवाडी, मैलखड्डा, मंगळवार पेठ, फुलेवाडी, सुतार मळा, रंकाळा परिसरातील झोपड्या, आदी ठिकाणच्या कामगार कुटुंबीयांना दोन वेळचे घरपोच जेवण दिले जात आहे.
तसेच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण व नातेवाईक शेंडा पार्क, पन्हाळा, शासकीय तंत्रनिकेतन, आदी ठिकाणच्या लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. व्हाईट आर्मीचे सर्व जवान यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.इको अॅम्ब्युलन्स सेवाकोरोनाशी लढणाऱ्या विविध घटकांना कोणत्याही प्रकारच्या विषाणूपासून संसर्ग होऊ नये यासाठी निर्जंतुकीकरण करण्याठी इको अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, अॅस्टर आधारचे डॉ. अमोल कोडोलीकर, कस्तुरी रोकडे यांनी निर्जंतुकीकरण स्प्रे तयार करून त्याचा लाभ रुग्णवाहिकेसाठी करण्यात आला आहे.