कोल्हापूर : रुग्णांची संख्या वाढत आहे हे खरे असले तरी कोल्हापुरात तूर्तात लॉकडाऊन कडक करण्यात येणार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी सायंकाळी स्पष्ट केले.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत लॉकडाऊन कडक करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री कार्यालयाच्या पातळीवर चर्चेत होत्या. त्याअनुषंगाने सोमवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पालकमंत्री पाटील सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी यासंबंधी चर्चा करणार होते, परंतु ती चर्चा होऊ शकली नाही.रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांनी स्वयंस्फूर्तीनेच लॉकडाऊन कडक केला आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाने व आजरा शहरातील बाजारपेठ आज, मंगळवारपासून ११ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. असाच निर्णय अन्य गावांतही झाला आहे.कोल्हापुरातही रुग्ण आणि मृत्यूसंख्या वाढल्याने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरच लॉकडाऊन कडक करण्याचा विचार सुरू आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री पाटील म्हणाले, रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्नशील आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जिल्ह्यात चांगले आहे.त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करायला हव्यात, त्या आम्ही करत आहोत. त्यासाठी लॉकडाऊन करण्याची तूर्तास तरी आवश्यकता वाटत नाही. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळावी, त्यांनी काळजी घ्यावी व अनावश्यक गर्दी टाळावी, सायंकाळनंतर अनावश्यक फिरणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 1:36 AM